ओंकार प्रधान रुप गणेशाचे | हे तिन्ही देवांचे जन्मस्थान ||धृ||
अकार तो ब्रम्हा, उकार तो विष्णू | मकार महेश जाणियेला ||१||
असे तिन्ही देव जेथोनि उत्पन्न | तो हा गजानन मायबाप ||२||
तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी | पहावी पुराणी व्यासाचिया ||३||
आले देवाचीच्या मना तेथे कोणाचे चालेना ||
हरिश्चंद्र ताराराणी वाहे डोंबाघरी पाणी ||
पांडावांचा साहाकारी राज्यावरोनि केले दुरी ||
तुका म्हणे उगी रहावे जे जे होईल ते ते पहावे ||
वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा | येरांनी वाहावा भार माथा ||
खादल्याची गोडी देखिल्यासी नाही | भार धन वाही मजूरीचे ||
उत्पीतीपाळण संहाराचे निज | जेणे नेले बीज त्याचे हाती ||
तुका म्हणे आम्हा सापडले मूळ | आपणची फळ आले हाता ||